बागलकोटमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर वेळेत लस न घेतल्यामुळे एका २२ वर्षीय युवकाचा वेदनादायक मृत्यू झाला आहे. लस घेण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हा दुर्दैवी प्रसंग ओढवला असून निधनापूर्वी या युवकाने भोगलेल्या यातनांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यामधील गोलसंगी गावचा रहिवासी प्रदीप चंद्रशेखर हळेरळ्ळी हा मार्च महिन्यात बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यामधील मन्नीकेरी चंद्रादेवी यात्रेसाठी आला होता. या यात्रेत त्याला एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. परंतु, त्यावेळी त्याने अँटी-रेबीज लस न घेता उपचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. परिणामी, काही दिवसांनंतर त्याच्या शरीरात रेबीजची लक्षणे दिसू लागली आणि त्याची प्रकृती खालावली.

प्रकृती गंभीर झाल्यानंतर या युवकाला आधी निडगुंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर बागलकोटमधील केरुडी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्याला बागलकोट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच रात्री या युवकाचा मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतर लस न घेतल्यास रेबीज हा आजार किती जीवघेणा ठरू शकतो, हेच या घटनेतून समोर आले असून नागरिकांनी अशा बाबींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.


Recent Comments