धारवाडसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यात यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने उडी घेत आपला पाठिंबा जाहीर केला असून, यामुळे आंदोलनाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.

हुबळी-धारवाड महापालिका कार्यालयासमोर सुरू असलेल्या या धरणे आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. अल्पावधीतच सोशल मीडियावर लाखो फॉलोव्हर्स मिळवून देशात चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे समर्थक सलीम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धारवाड हे शांत शहर असून, हुबळी-धारवाड एकत्रित महापालिकेच्या भेदभावपूर्ण धोरणामुळे धारवाडचा विकास पूर्णपणे खुंटला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

धारवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महापालिका असणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यपाल कायदेशीर सल्ल्याचे कारण पुढे करून या प्रक्रियेला विनाकारण उशीर करत आहेत, जे योग्य नाही. त्यांनी तातडीने या प्रस्तावावर स्वाक्षरी करून स्वतंत्र महापालिकेची घोषणा करावी, अशी मागणी सलीम यांनी व्यक्त केली.


Recent Comments