विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी कालव्याद्वारे जादा पाणी सोडण्याबाबत रामपूर येथील केबीजेएनएल कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. आमदार अजय सिंग आणि आमदार अशोक मनगुळी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.


या बैठकीत आमदार आणि अधिकार्यांमध्ये सिंदगी तालुक्यातील पाण्याची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याच्या टंचाईबाबत सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नागरिक व जनावरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांमुळे कालव्याद्वारे तातडीने जादा पाणी सोडणे अत्यंत गरजेचे असल्याचा सूर या बैठकीत उमटला.


बैठक सुरू असतानाच आमदार अशोक मनगुळी यांनी उपमुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि सिंदगी भागातील गंभीर पाणीटंचाईची माहिती दिली. शेतकरी, ग्रामीण जनता आणि जनावरांच्या हितासाठी तातडीने अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली. याच वेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत ठेवण्याचे आणि कोणत्याही गावात पाण्याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. जनतेच्या या समस्येवर सरकार सकारात्मक आणि जलद पावले उचलून दिलासा देईल, असा विश्वास आमदार अशोक मनगुळी यांनी व्यक्त केला.


Recent Comments