घटप्रभा नदीवर बॅरेजसह पूल बांधल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.


यमकनमर्डी मतदारसंघातील नागनूर के. एम. आणि सुतगट्टी गावांच्या दरम्यान घटप्रभा नदीवर सुमारे १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बॅरेजसह पुलाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.


यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री म्हणाले की, घटप्रभा नदीवर बांधण्यात येणाऱ्या या पुलामुळे आणि बंधाऱ्यामुळे या भागात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार असून १८० हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय मिळणार आहे. तसेच सुतगट्टी, नागनूर, मल्लट्टी जवळील १५ गावांना जोडणारा संपर्क मार्ग उपलब्ध होईल. या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले आहे.

या प्रसंगी बेळगावचे पोलीस आयुक्त बोरसे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, लहान सिंचन विभागाचे सहाय्यक अभियंता संजय माळगे, शिवलीला मिक्कन्नवर आणि नेते किरण रजपूत उपस्थित होते.

कंत्राटदार अशोक सानमुद्दी यांनी मंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि कामाची माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी हुक्केरी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद, पोलीस निरीक्षक जावेद मुशापीर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments