धारवाडसाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्यात यावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज तिसऱ्या दिवशी नवलगुंदचे आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.

धारवाडमधील हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या या धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. या आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी सांगितले की, धारवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महानगरपालिका असणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या निधीची प्रचंड कमतरता जाणवत असून महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व कारभाराला लगाम घालण्यासाठी धारवाडला स्वतंत्र महापालिका मिळालीच पाहिजे. कोणत्याही पक्षाचा विचार न करता विविध संघटना आणि संस्थांचे नेते एकत्र येऊन जे आंदोलन करत आहेत, त्याला माझा नेहमीच पाठिंबा राहील. तसेच या संदर्भात लवकरच राज्यपालांची भेट घेऊन स्वतंत्र महापालिकेची मागणी पूर्ण करण्यासाठी आग्रही मागणी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या मागणीसाठी लवकरच राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यावर दबाव आणणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.



Recent Comments