बागलकोट जिल्ह्यातील कलादगी गावातील गुरुलिंगेश्वर पदवीपूर्व कॉलेजमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. कॉलेजच्या प्राध्यापकांच्या खोलीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक ही आग लागली असून या आगीत खोलीतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.


कलादगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून सकाळी कॉलेज सुरू होण्याच्या वेळीच प्राध्यापकांच्या खोलीतून दाट धूर निघताना दिसला. पाहता पाहता शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने संपूर्ण खोलीला कचाट्यात घेतले आणि आतील फर्निचरसह इतर सर्व साहित्य जळून खाक झाले. या खोलीत ठेवलेल्या विद्यार्थ्यांच्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांचेही आगीमुळे अल्प प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तातडीने सुरक्षित अंतर गाठल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. जवानांच्या तत्परतेमुळे आग कॉलेजच्या इतर वर्गांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. घटनास्थळाला कलादगीच्या उपतहसीलदारांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली असून कलादगी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


Recent Comments