पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अच्छे दिन’च्या काळात देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून केंद्राच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नामुष्की ओढवली आहे, अशी घणाघाती टीका उद्योगमंत्री एम.बी. पाटील यांनी केली आहे.

विजापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्योगमंत्री एम.बी. पाटील यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला. कोरोना काळात औषधोपचार देण्याऐवजी थाळ्या वाजवायला सांगण्यात आल्या आणि आता देशाची अर्थव्यवस्था ढासळत असताना वाहनांऐवजी सायकल वापरण्याचा सल्ला दिला जात आहे, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांची खिल्ली उडवली. डॉलर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत भूतकाळात पंतप्रधान मोदींनी केलेली विधाने आज सामाजिक माध्यमांवर त्यांच्याच विरोधात व्हायरल होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

केंद्र सरकारच्या दबावामुळे काही माध्यमांच्या मालकांनाही आपलेसे करण्यात आले असून देशातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आजही महागाईमुळे अडचणीत आहेत, असा आरोप एम.बी. पाटील यांनी केला. देशाचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरले असून इस्रायल आणि पॅलेस्टाईन संदर्भातील सध्याच्या भूमिकेमुळे देशाची प्रतिमा मलिन झाली आहे, अशी प्रतिक्रिया एम.बी. पाटील यांनी दिली.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधताना, सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विविध गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते भाजपमध्ये प्रवेश करून नामानिराळे होत असून भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सर्व डाग स्वच्छ केले जात आहेत, अशा शब्दांत एम.बी. पाटील यांनी राजकीय परिस्थितीवर टीका केली.


Recent Comments