State

विकाससौधमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा घेतला आढावा

Share

राज्यातील पुलांच्या बांधकामांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेंगळुरूमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. कामाचा दर्जा राखला नाही किंवा विलंब झाला, तर अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बेंगळुरूच्या विकाससौधमध्ये आज सार्वजनिक बांधकाम विभागाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सतीश जारकीहोळी यांनी जनतेचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्याला विभागाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यात सुरू असलेले नवीन पुलांचे बांधकाम आणि जुन्या पुलांची दुरुस्ती ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कामाच्या दर्जाबाबत तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

मुख्य अभियंता आणि सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पावसाळ्यापूर्वी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचा निर्णय झाला. सार्वजनिक पैशांचा योग्य वापर झाला पाहिजे आणि प्रत्येक काम शास्त्रीय पद्धतीने व दीर्घकाळ टिकणारे असावे, असे मत सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा जारकीहोळी यांनी दिला. तसेच तांत्रिक अधिकाऱ्यांकडून प्रगती अहवाल घेऊन त्यांनी आवश्यक सूचना दिल्या आहेत.

Tags: