Belagavi

जाधव नगरमधील उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर

Share

बेळगावमधील जाधव नगरमध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या उद्यान विकासाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार आसीफ सेठ यांनी ६५ लाख रुपये खर्चाच्या या सुसज्ज उद्यानाच्या कामाचे अधिकृत भूमिपूजन केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील जाधव नगरमध्ये सार्वजनिक सोयीसाठी आमदार आसीफ सेठ यांनी विशेष निधीतून ६५ लाख रुपये मंजूर केले आहेत. या योजनेअंतर्गत सध्याच्या मोकळ्या जागेचे रूपांतर एका सुसज्ज उद्यानात करण्यात येणार आहे. यामध्ये चालण्यासाठी मार्ग , बसण्यासाठी आसन व्यवस्था, हिरवळ, आकर्षक रोषणाई आणि लहान मुलांसाठी खेळाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

या विकासकामाचा शुभारंभ करताना आमदार आसीफ सेठ यांनी शहरातील वाढत्या गरजा लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक, मुले आणि कुटुंबांसाठी सुरक्षित आणि हिरवेगार सार्वजनिक ठिकाण असणे आवश्यक असल्याचे सांगितले. हे उद्यान केवळ सुशोभीकरणापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया आसीफ सेठ यांनी दिली.

यावेळी महापालिकेचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवासी उपस्थित होते.

Tags: