हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा महोत्सव ४ मे २०२७ पासून सुरू होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे प्रमुख हक्कदार कुनाल पाटील यांनी दिली आहे. या भव्य धार्मिक सोहळ्याच्या नियोजनासाठी कमिटी सज्ज झाली असून तयारीला वेग आला आहे.


शहरातील महालक्ष्मी मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत कुनाल पाटील बोलत होते. २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजता हवालदार यांच्या निवासापासून रेडा सोडण्याचा पारंपरिक विधी पार पडणार आहे. त्यानंतर ४ मे २०२७ रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होईल. यावेळी खातेदार पाटील घराण्याकडून हालगांब प्रतिष्ठापना, सीमेवरून लक्ष्मी देवीला पाचारण करणे आणि दीपक असोदे यांच्या हस्ते तांदूळ उधळण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर देवीची विशेष पूजा आणि ओटी भरण्याचा सोहळा पार पडेल, असे कुनाल पाटील यांनी सांगितले.

त्याच दिवशी रात्री लक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक निघेल. हक्कदारांच्या घरी ओटी भरून घेतल्यानंतर पहाटे देवीची प्रतिष्ठापना केली जाईल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी रेड्याची मिरवणूक काढून रंगप्रवेशासह लक्ष्मी देवीला सीमेवर पाठवून यात्रेची सांगता केली जाईल, अशी माहिती कुनाल पाटील यांनी दिली.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, कार्याध्यक्ष सुनील पर्वतराव, सचिव बसनागौडा पाटील, उपसचिव मल्लिकार्जुन देसाई, हक्कदार गिरीश कुलकर्णी, अप्पासाहेब शेट्टीमनी, संतोष हवालदार, बसवन्नी कर्देगौडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments