Bagalkot

हिप्परगीमध्ये बिबट्याची दहशत

Share

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील हिप्परगी गावात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी वावर असलेला बिबट्या आता थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचला असून, जनावरांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.

हिप्परगी गावाच्या शिवारातील ईरप्पा वज्जरवाड यांच्या शेतातील घरात बांधलेल्या म्हशीवर बिबट्याने भीषण हल्ला केला. नदीकाठी असलेल्या या शेतात काल संध्याकाळी बिबट्याने अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये म्हशीच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. म्हशीचा ओरडण्याचा आवाज ऐकून मालक ईरप्पा बाहेर आले असता, त्यांना प्रत्यक्ष बिबट्या दिसला. ईरप्पा यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला. बिबट्याच्या वावराचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून ठिकठिकाणी पावलांचे ठसेही उमटले आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र भीती पसरली असून, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज दुपारी १२ वाजता जमखंडीचे एसी (सहाय्यक आयुक्त) घटनास्थळी भेट देणार आहेत. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: