Bagalkot

लोकापूरमधील केशव सिमेंट कारखान्याला कामगारांनी ठोकले टाळे

Share

कमी पगार, कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधनांचा अभाव आणि तक्रार केल्यास कामावरून काढून टाकण्याची भीती, या त्रासाला कंटाळून लोकापूरमधील केशव सिमेंट कारखान्याच्या कामगारांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. कामगारांनी आज कारखान्याचे कामकाज बंद पाडून आंदोलन केले.

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील लोकापूर जवळील या कारखान्यात कामगार १९ वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. सध्या मिळणाऱ्या १० ते १५ हजार रुपयांत उदरनिर्वाह करणे कठीण असल्याने, मासिक वेतन २२ हजार रुपये करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. आक्रमक झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

कारखान्यात साधे शूज आणि हेल्मेट देखील दिले जात नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कंत्राटी कामगारांच्या तुलनेत स्थानिक कामगारांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनाविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. जोपर्यंत मालक स्वतः येऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे.

Tags: