Athani

आमदार लक्ष्मण सवदी यांच्यावर सूडबुद्धीने राजकारणाचा आरोप

Share

भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले आणि ७० हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले. मात्र, आता आमदार सवदी यांचा गट स्वतःसाठी झटणाऱ्या नेत्यांनाच संपवण्याचे काम करत असल्याचा प्रश्न काँग्रेस वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

या सूडबुद्धीच्या राजकारणाचा पुरावा म्हणून गजानन मंगसुळी यांच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून मंगसुळी यांचे नाव निश्चित मानले जात होते, मात्र सवदी यांच्या प्रवेशामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पोटनिवडणुकीतील पराभव आणि पक्षासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही, वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाखातर आणि लक्ष्मण सवदी यांची पक्षाला असलेली गरज ओळखून मंगसुळी यांनी उमेदवारीचा त्याग केला होता.

मात्र, इतका मोठा त्याग करणाऱ्या गजानन मंगसुळी यांच्या विरोधात आमदार सवदी यांचा गट सूडबुद्धीने राजकारण का करत आहे, असा सवाल मूळ काँग्रेस निष्ठावंतांनी विचारला आहे. एका कार्यक्रमादरम्यान लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी यांच्या शेजारी उभे असलेल्या गजानन मंगसुळी यांचे छायाचित्र जाणीवपूर्वक पुसून टाकण्यापर्यंत या गटाची मजल गेली आहे. या प्रकारामुळे मंगसुळी समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.

२०१९ च्या पोटनिवडणुकीपासून २०२३ पर्यंत अथणीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून काँग्रेस पक्ष संघटित करण्याचे काम गजानन मंगसुळी यांनी केले. भाजप सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करताना लक्ष्मण सवदी यांनी मंगसुळी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते.

मात्र, निवडून आल्यानंतर आमदार लक्ष्मण सवदी अथणीतील मूळ काँग्रेस नेत्यांनाच डावलण्याचे काम करत आहेत. सवदी यांच्यासाठी उमेदवारीचा त्याग करणाऱ्या गजानन मंगसुळी यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न सवदी गटाकडून सातत्याने होत असल्याचा आरोप मूळ काँग्रेस नेत्यांनी केला आहे. गजानन मंगसुळी यांचे छायाचित्र हटवून चिदानंद सवदी यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्रिपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या लक्ष्मण सवदी यांच्या मतदारसंघात मूळ काँग्रेस नेत्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती काँग्रेस हायकमंडपर्यंत पोहोचवणार असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.

Tags: