Bagalkot

केरूरच्या यात्रोत्सवात हेलिकॉप्टरमधून रथावर पुष्पवृष्टी

Share

बागलकोट जिल्ह्यातील केरूूर शहरात आज ग्रामदैवतांच्या ऐतिहासिक यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवात हेलिकॉप्टरमधून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील केरूूर शहरात आज ग्रामदैवता श्री द्यामव्वा आणि श्री दुर्गव्वा देवीचा जत्रोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. नऊ वर्षांतून एकदा येणारा हा दुर्मिळ योग अनुभवण्यासाठी राज्यभरातून २० हजारांहून अधिक भाविकांनी केरूूरमध्ये गर्दी केली होती. शहरातील मुख्य मार्गावरून देवींच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढल्यानंतर झालेल्या रथोत्सवाने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

यंदाच्या रथोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे रथावर केलेली पुष्पवृष्टी. आकाशातून फुलांचा वर्षाव सुरू होताच भाविकांनी ‘उदो उदो’च्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण केली. हुबळी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पिवळा भंडारा पसरल्याने संपूर्ण केरूूर नगरी जणू सुवर्णमयी झाल्याचा भास होत होता. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती.

यात्रेनिमित्त शहरभर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागवून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. धार्मिक विधींसोबतच नाटक आणि विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केल्याने शहरात उत्सवाचे वातावरण होते. एकूणच, नऊ वर्षांनंतर भरलेली ही महायात्रा केरूूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली आहे.

Tags: