Khanapur

खानापूरची वैष्णवी मेदार मुगळीहाळ केंद्रात प्रथम

Share

खानापूर तालुक्यातील गंदिगवाड येथील परंज्योती हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी यल्लाप्पा मेदार हिने २०२६ च्या एसएसएलसी परीक्षेत ९८.९५ टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन करत मुगळीहाळ परीक्षा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गंदिगवाडमधील परंज्योती हायस्कूलची स्थापना १९७३ मध्ये झाली असून, गेल्या ५३ वर्षांत इतके उच्चांकी गुण मिळवणारी वैष्णवी ही पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे. अत्यंत कठीण परिश्रमातून तिने हे यश मिळवले असून, यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी भावना मुख्याध्यापक एस. एम. नायक यांनी व्यक्त केली.

वैष्णवीचे वडील यल्लाप्पा मेदार हे आपल्या पारंपरिक व्यवसायासोबतच राजकारणातही सक्रिय असून, त्यांनी सलग तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. सात भावांच्या या कुटुंबात शिक्षणाला मोठे महत्त्व असून, त्यापैकी पाच जण शासकीय सेवेत कार्यरत आहेत. डॉ. महादेव मेदार हे शिक्षण विभागात केईएस अधिकारी असून, कुटुंबातील इतर सदस्य देखील शिक्षक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. याच शैक्षणिक वारशातून वैष्णवीने आपले यश सिद्ध केले आहे.

शिक्षणापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीही नाही. पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, कारण शिक्षण हीच खरी शक्ती आहे, असा संदेश केईएस अधिकारी डॉ. महादेव मेदार यांनी दिला आहे. मुगळीहाळ केंद्रात प्रथम आल्याबद्दल वैष्णवीचा तिच्या शिक्षकांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

वैष्णवीच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. नायक, पी. बी. वाजरे, व्ही. एस. इटगी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. उमेश मुळीमनी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल गंदिगवाड ग्रामस्थांनी आणि कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे.

Tags: