बागलकोट जिल्ह्यातील इळकल शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या हल्ल्यात एका चिमुरडीसह एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


इळकलमधील कुलकर्णी पेठ भागात भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. घराबाहेर उभी असलेल्या ६ वर्षीय श्रीनिधी मडिवाळ या चिमुरडीवर आणि कामासाठी जात असलेल्या यासीन साब या तरुणावर कुत्र्यांनी अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. एकाच परिसरात घडलेल्या या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, हे कुत्रे पिसाळलेले असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही इळकल शहरात ३५ हून अधिक जणांना कुत्र्यांनी लक्ष्य केले असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे पालक आणि नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि त्यांचे लसीकरण करून ही समस्या नियंत्रणात आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. आतातरी प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


Recent Comments