Vijayapura

विजापूरमध्ये सिग्नलवर सावलीसाठी उभारलेल्या टेंटच्या खर्चावरून संताप

Share

विजापूर शहरात वाढत्या उन्हापासून वाहनधारकांचे रक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने सिग्नलवर सावलीची व्यवस्था केली आहे. मात्र, या टेंटच्या कामासाठी काढण्यात आलेल्या १२ लाख रुपयांच्या अवाढव्य निविदेमुळे प्रशासकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता विजापूरमधील बस स्थानक परिसर, बसवेश्वर चौक, गांधी चौक, सोलापूर रस्ता, कोर्ट सर्कल आणि वज्र हनुमान नगर या सहा प्रमुख ठिकाणी तात्पुरते टेंट उभारण्यात आले आहेत. मार्च ते जून या कालावधीसाठी लावण्यात आलेल्या या टेंटसाठी १२ लाखांहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी कंत्राटदाराला ही रक्कम देण्यापेक्षा पालिकेने स्वतः साहित्य खरेदी करावे, असा सूर आता उमटत आहे.

महानगरपालिकेने केवळ काही ठराविक ठिकाणीच ही व्यवस्था केली असून प्रत्यक्षात खर्चाच्या तुलनेत काम कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एवढ्या मोठ्या रकमेची निविदा काढणे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका यासीन जवळी यांनी केली.

काही महत्त्वाच्या चौकांमध्ये अद्याप टेंट लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे वाहनधारकांना भर उन्हात सिग्नलची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासन केवळ निविदेच्या प्रक्रियेत रस दाखवते, पण सर्वसामान्यांच्या सोयीकडे दुर्लक्ष करते, अशी भावना अशोक जाधव यांनी व्यक्त केली. तर सावलीची सोय चांगली असली तरी त्यासाठी होणारा खर्च संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया फय्याज कलादगी यांनी दिली.

महापालिका प्रशासनाने पुढील वर्षापासून कंत्राट पद्धत बंद करून स्वतः साहित्य खरेदी करावे आणि खर्चात बचत करावी, अशी मागणी विजापूरमधील नागरिक करत आहेत.

Tags: