हुक्केरी येथील बापूजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात १८ व्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेचे उद्घाटन दिमाखात पार पडले.


सार्वजनिक शिक्षण विभागाचे अपर आयुक्त ईश्वर उळागड्डी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ झाला. विद्यार्थ्यांनी अंगीकारलेली कौशल्ये आणि त्यांनी केलेली कामगिरी हीच त्यांच्या जीवनातील यशाची पायरी ठरते. त्यामुळे खेळाडूंनी पूर्ण आत्मविश्वासाने क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ईश्वर उळागड्डी यांनी केले. यावेळी बापूजी शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाच्या वतीने ईश्वर उळागड्डी यांचा सत्कार करण्यात आला.


डॉजबॉल हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय खेळ आहे. हुक्केरी तालुक्यातील मसरगुप्पी येथील बापूजी शिक्षण संस्थेत १८ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होणे ही कौतुकास्पद बाब आहे. या स्पर्धेत देशातील २० राज्यांमधून सुमारे ३५ संघ सहभागी झाले आहेत, अशी माहिती संजीवकुमार नवलगुंद यांनी दिली.

या उद्घाटन प्रसंगी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामीजी, विरक्तमठाचे शिवबसव महास्वामीजी आणि विरूपाक्ष महास्वामीजींचे दिव्य सान्निध्य लाभले. मंचावर कर्नाटक डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डी. व्यंकटेश मूर्ती, सचिव पी. एस. ब्रार, जिल्हा सचिव श्रीशैल कौजलगी, चिक्कोडी शिक्षण जिल्ह्याचे उपसंचालक आर. एस. सितारामू आणि क्षेत्र शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक महंतेश बससापुरे, जावेद मुषापुरे, ए. एस. गुदिगोप्प, प्राचार्य एच. वाय. संकण्णवर, लीलावती हिरेमठ, प्रशासकीय अधिकारी बसवराज अम्मणगी यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments