Bagalkot

बागलकोटमध्ये वाढत्या तापमानाचा कुक्कुटपालन व्यवसायाला फटका

Share

उत्तर कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात सूर्याचा प्रकोप वाढला असून वाढत्या तापमानाचा मोठा फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत.

बागलकोट जिल्ह्याचे तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. वास्तविक, कोंबड्यांच्या संगोपनासाठी २९ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते, मात्र सध्याच्या उष्णतेमुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी दगावत आहेत. शहरातील हमाल कॉलनी जवळील नूरजहान रोळी यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये उष्णतेमुळे मोठी हानी झाली आहे. त्यांच्या १७०० कोंबड्यांपैकी अनेक कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला असून, यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

उन्हापासून कोंबड्यांचे रक्षण करण्यासाठी व्यावसायिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शेडवर पाणी सोडणे, स्प्रिंकलरद्वारे थंडावा निर्माण करणे आणि सतत फॅन सुरू ठेवूनही उष्णता नियंत्रणात येत नाहीये. या भीषण संकटामुळे कुक्कुटपालन व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Tags: