Dharwad

आजीच्या अंत्यसंस्कारावरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Share

आजीचे अंत्यविधी आटोपून गावी परतत असताना दुचाकीचे नियंत्रण सुटून झाडाला धडकल्याने २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धारवाड तालुक्यातील शिवल्ली रस्त्यावर आज ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

धारवाड तालुक्यातील गोवनकोप्प येथील विनायक सुळ्ळद (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. विनायक आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता, मात्र तेथून परतताना त्याच्यावर काळाने झडप घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक आपल्या दुचाकीवरून गावी परतत असताना शिवल्ली-धारवाड रस्त्यावर हा अपघात झाला. दुचाकीचा वेग अधिक असल्याने विनायकचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, विनायकचा जागीच मृत्यू झाला. आजीच्या निधनानंतर अवघ्या काही वेळातच विनायकचाही असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गोवनकोप्प गावावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: