Bagalkot

पूजेच्या बहाण्याने सोनसाखळी पळवणारा भामटा पुजारी गजाआड

Share

पूजेच्या बहाण्याने सोनसाखळी चोरणाऱ्या एका भामट्या पुजाऱ्याला जेरबंद करण्यात बागलकोट जिल्ह्यातील बदामी पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपीने वास्तुदोष निवारण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केली होती.

घरातील वास्तुदोष दूर करतो असे सांगून राघवेंद्र बजरंगी नावाच्या नक्कली पुजाऱ्याने बदामी येथील कालिदास कॉलेज परिसरातील रहिवासी गंगव्वा पाटील यांचा विश्वास संपादन केला होता. पूजेच्या वेळी कलशावर सोन्याचे दागिने ठेवणे आवश्यक असल्याचे त्याने भासवले. घरातील लोक देवाच्या दर्शनात मग्न असताना संधी साधून या भामट्याने २३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी घेऊन पोबारा केला.

ही घटना ८ डिसेंबर रोजी घडली होती, मात्र उशिरा उघडकीस आल्यानंतर २९ डिसेंबर रोजी बदामी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून चोरी केलेली सोनसाखळी हस्तगत केली. जप्त केलेले दागिने मूळ मालक गंगव्वा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, नागरिकांनी अशा अनोळखी पुजाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags: