Dharwad

गामनगट्टी येथे कऱ्याम्मा देवी यात्रोत्सवानिमित्त भव्य मैदानी कुस्ती स्पर्धा

Share

धारवाड जिल्ह्यातील हुबळी तालुक्यात असलेल्या गामनगट्टी येथील श्री कऱ्याम्मा देवी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय भव्य मैदानी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत पैलवानांनी सादर केलेल्या रोमांचक लढतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

गामनगट्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या या मैदानी कुस्ती स्पर्धेत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम बक्षीस अर्धा तोळा सोने, द्वितीय बक्षीस चार आणे सोने आणि तृतीय बक्षीस १५ तोळे चांदी असे होते. एकूण दहा आकर्षक बक्षिसे विजेत्या पैलवानांना देण्यात आली. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या कुस्ती स्पर्धेत अनेक लहान कुस्तीपटू देखील सहभागी झाले होते.

कुस्ती शौकिनांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले. आधुनिक जगात ग्रामीण क्रीडा प्रकार लोप पावत असताना, गामनगट्टी गावातील ग्रामस्थ आणि वडीलधाऱ्या मंडळींनी अशा मैदानी कुस्तीचे आयोजन करून युवा पिढीला या परंपरेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला, हे विशेष कौतुकास्पद आहे.

Tags: