हुक्केरी शहराला रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपुन काढले. पावसामुळे हुकेरीवासियांचे जनजीवन विस्कळीत झाले.

हुक्केरीत रविवारी सायंकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसाचा आणि वाऱ्याचा जोर इतका होता की, बायपास रस्त्यावरील पंक्चर दुकानाचे पत्र्याचे छत उडून गेले. शेजारील कोल्ड्रिंक्स दुकानातील साहित्यही अस्ताव्यस्त झाले. एवढेच नाही तर अनेक वीजखांब रस्त्यावर कोसळले. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून विद्युत सहकारी संघाने तातडीने वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. 

पावसाच्या पाण्याने अनेक शहरातील घरात घुसखोरी केली. गजबरवाडीतील गटारीचे पाणी ओव्हरफ्लो होऊन घरात घुसल्याने नागरिकांच्या संसारिक साहित्याचे नुकसान झाले. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू मुजावर यांनी सांगितले की, गजबरवाडीतील गटारींचे पाणी मोठ्या प्रमाणात शेजारील झोपड्यांमध्ये घुसल्याने रहिवाशांचे नुकसान झाले आहे. हुक्केरी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना येथील गटारी दुरुस्त करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली होती. परंतु त्यांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती उदभवली आहे. किमान आता तरी इकडे लक्ष देऊन गटारी दुरुस्त कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. 
दरवर्षी पावसाळ्यात हुक्केरीत बायपास रस्त्यावर काही ना काही दुर्घटना घडत आहेत. या रस्त्यावर अतिक्रमण करून तात्पुरते शेड उभारून व्यवसाय थाटलेल्यांवर पंचायत अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहे.


Recent Comments