Hukkeri

बेनिवाडमध्ये मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते घरोघरी दाखले योजनेला चालना

Share

हुक्केरी तालुक्यातील ग्राम पंचायतींद्वारे यापुढे घरोघरी महसुली उतारे देण्यात येतील असे वन तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले.

हुक्केरी तालुक्यातील बेनिवाड गावात सरकारच्या ‘महसुली उतारे शेतकऱ्यांच्या दारात’ या योजनेचे उदघाटन मंत्री कत्ती यांच्याहस्ते झाले. यावेळी यांच्याहस्ते ग्रामस्थांना सातबारा उतारा, नकाशा, उत्पन्न आणि जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार डॉ. डी.एच. हुगार यांनी प्रास्ताविक केले. ग्रापं अध्यक्षा गंगव्वा कुंबार, पीडीओ एम. ए. कांबळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने मंत्री कत्ती यांचा सत्कार केला.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक महानिंग सनदी, अशोक पाटील, बसवराज पाटील, तापं अधिकारी उमेश सिदनाळ, सहायक कृषी संचालक महादेव पटगुंदी, एडीएलआर शशिकांत हेगडे, महसूल निरीक्षक प्रवीण माळाज, ग्राम लेखापाल उमेश नागराळे आदी उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले, सरकारने महसुली दाखले घरोघरी देण्याची योजना संपूर्ण राज्यात जारी केली आहे. महसूल खात्याची ही महत्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांना, जनतेला कसलाही त्रास न होता सातबारा, जमिनीचे नकाशे, जात=उत्पन्न आदी प्रमाणपत्रे, दाखले घरबसल्या देण्यात येणार आहेत असे ते म्हणाले.

त्यानंतर ‘आपली मराठी’सोबत बोलताना तहसीलदार हुगार म्हणाले, महसूल खात्याची घरोघरी दाखले देण्याची ही योजना संबंधित ग्राम पंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात येईल. यात गावकऱ्यांना घरबसल्या महसुली दाखले देण्यात येणार आहेत.

यावेळी विविध खात्यांचे अधिकारी, ग्रापं सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: