गेल्या २ वर्षांपासून बंद असलेल्या शाळा – महाविद्यालयांना कर्नाटक सरकारने आजपासून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळूरमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना धैर्य देऊन मनोबल वाढविले.

देशभरात कोविड परिस्थिती निर्माण झाल्यापासून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद होती. आज कर्नाटकात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून राज्यभरातील अनेक शाळांचे आवार आज पुन्हा एकदा गजबजले. विद्यार्थ्यांच्या मनातील हुरहूर लक्षात घेत आज बंगळूर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी धैर्य देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
बंगळूरमधील मल्लेश्वरम येथील सरकारी महाविद्यालयांस भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गेल्या चार महिन्यांपूर्वी राज्यातील इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री बोम्मई आणि शिक्षण मंत्री बी. सी. नागेश तसेच उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी बंगळूर येथील मल्लेश्वरम सरकारी महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना टॅबचे वितरणदेखील करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः वर्गात जाऊन तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी कोविड संदर्भातील अत्यावश्यक असलेल्या मार्गसूचीचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन केले. आपले आरोग्य जपावे तसेच धैर्याने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, असा सल्लादेखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेट देऊन साधलेल्या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील उत्साह दिसून आला.


Recent Comments