Belagavi

इनाम बडस गावात डॉ. आंबेडकर भवनासाठी भूमिपूजन

Share

इनाम बडस या गावातील दलित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार असून, या भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडला.

बेळगाव तालुक्यातील इनाम बडस हे दलित बहुल गाव असून, या गावात सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी कोणतेही सभागृह किंवा योग्य सुविधा नव्हती. गावातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी अभ्यास व उपक्रमांचे ठिकाण नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यास मान्यता दिली. दिनांक ४ मे २०२५ रोजी त्यांनी या भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले.

या प्रसंगी बेळगाव जिल्हा छलवादी महासभेचे उपाध्यक्ष कृष्णा गोविंद कांबळे यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सन्मान केला.यावेळी इनाम बडस गावातील दलित नेते आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख तुकाराम लक्ष्मण कांबळे हे देखील उपस्थित होते. भूमिपूजन कार्यक्रमात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना म्हटले की, शिक्षणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. तरुणांनी योग्य दिशेने वाटचाल करत शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यश मिळवावे. तसेच आंबेडकर भवनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून गावातील नागरिकांसाठी ते उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Tags: