Belagavi

बेळगावात विविध संघटनांच्या वतीने भव्य बसव जयंती मिरवणूक

Share

कर्नाटक सरकारने सांस्कृतिक नेते म्हणून गौरवलेले जगज्योती बसवेश्वर यांची जयंती यंदा बेळगावात प्रथमच अत्यंत भव्यतेने साजरी करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीने आणि शेकडो नागरिकांच्या सहभागातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

बेळगावात बसव जयंतीनिमित्त काढण्यात आलेली भव्य मिरवणूक ही बसवपर संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त पुढाकारातून राणी चन्नम्मा चौकातून सुरुवात झाली. प्रारंभी मठाधीश आणि मान्यवरांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

यानंतर कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामी, नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री अल्लमप्रभु स्वामी, हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी यांच्यासह अनेक मठाधीशांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला.

या प्रसंगी खासदार जगदीश शेट्टर, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, दक्षिण आमदार अभय पाटील, चिकोडी-सदलगा आमदार गणेश हुक्केरी, रायबाग आमदार दुर्योधन ऐहोळे, के.एल.ई. चे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार अनिल बेनके, माजी विधानपरिषद सदस्य महांतेंश कवटगिमठ, रत्नप्रभा बेल्लद, शंकर गुडस, ईरण्णा देयन्ननवर यांसारख्या अनेक मान्यवरांनी ढोल वाजवून मिरवणुकीचा प्रारंभ केला.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेकांनी नृत्य सादर केले. जगज्योती बसवेश्वरांची मूर्ती घेऊन चित्ररथासह मिरवणूक पुढे सरकली. शरण संस्कृतीचे दर्शन घडवणारी विविध सांस्कृतिक देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

विविध मठाधीशांनी यावेळी आपल्या भाषणांत शरण संस्कृतीची महती सांगितली. पीएचडीसारख्या शैक्षणिक अभ्यासासाठीही आज शरण संस्कृती खुली आहे. जात, धर्म, पंथ यापलीकडे सर्वांनी विश्वगुरु बसवेश्वरांच्या कार्याला आज मानवंदना दिली आहे.

बेळगावातून सुरु झालेली हि भव्य मिरवणुक राज्यभर एक आदर्श ठरेल. राज्योत्सवाप्रमाणेच बसव जयंती म्हटल्यावरही बेळगावचा उल्लेख आदराने होईल. सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येऊन बसवेश्वरांना अभिवादन करत असल्याचे हे दृश्य स्तुत्य असे होते.. आगामी काळात ही जयंती बसवोत्सव म्हणूनच साजरी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून सुरु झालेली ही मिरवणूक काकतीवेस मार्गे गणपत गल्लीतून, मारुती गल्ली, रामदेव

गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे पुढे लिंगराज कॉलेज परिसरात समाप्त झाली.

Tags: