Belagavi

देश-विदेशात पदव्या मिळवलेले खरे विद्वान म्हणजे बाबासाहेब; काँग्रेसच्या अन्यायावर भाजपचा प्रहार

Share

बेळगावच्या सामर्थ्य भवनात भाजपने आयोजित केलेल्या चर्चासत्रात काँग्रेसवर सडकून टीका करताना आमदार अभय पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे विद्वान असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि मृत्यूनंतरही अन्यायच केल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्या काळात देशातच नव्हे तर परदेशातही अनेक पदव्या संपादन करणारे आणि विद्वत्तेचं प्रतीक ठरणारे व्यक्तिमत्व जर कोणी असेल, तर ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत. मात्र काँग्रेसने त्यांच्यावर कसा अन्याय केला, हे समजून घेणं आज गरजेचं आहे, असे मत बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी मांडले.

पी. बी. रोडवरील सामर्थ्य भवन येथे भारतीय जनता पक्षातर्फे ‘काँग्रेस म्हणजे जळणारं घर, सावध राहा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार अभय पाटील, भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, नगरसेवक राजशेखर डोणी, गीता सुतार, रवी द्यामण्णवर, प्रकाश राठोड, रमेश देशपांडे, राजेंद्र हरकुंणी, ईरय्या खोते, गणेश देसाई, राजकुमार पावळे, विजय कोडगानूर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, बाबासाहेबांविषयी समाजात अनेक चुकीच्या समजुती आहेत. काँग्रेसने त्यांना नेहमीच डावललं. लोकांना हे सत्य कळणं आवश्यक आहे. देशात पंडित कोण असतील, तर ते बाबासाहेबच; डिग्री न घेतलेल्यांना पंडित म्हणणं चुकीचं आहे. काँग्रेस सरकारने बाबासाहेबांना लोकप्रियतेपासून आणि सत्तेपासून वंचित ठेवलं आणि स्वतःचा फायदा करून घेतला.

कणबर्गी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अडरय्या अष्टगी यांनी यावेळी सांगितलं की, २५ एप्रिल १९४८ रोजी एससी-एसटी फेडरेशनच्या सभेत बाबासाहेबांनी काँग्रेस म्हणजे जळणारं घर आहे, असं स्पष्टपणे म्हटलं होतं आणि दलितांनी त्यापासून दूर राहावं असं आवाहन केलं होतं. बाबासाहेबांनी काँग्रेसविषयीचा आपला रोष सार्वजनिकरित्या व्यक्त केला होता. मात्र आजच्या काही दलित नेत्यांनी हे सगळं विसरून काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे, ही चिंतेची बाब आहे. बाबासाहेबांच्या हयातीतही आणि मृत्यूनंतरही काँग्रेसने त्यांच्यावर अन्यायच केला. नेहरू-गांधींच्या त्रासामुळे बाबासाहेबांचं आयुष्य कमी झालं, असंही त्यांनी नमूद केलं.

Tags: