शिवजयंतीनिमित्त आज गुरुवारी बेळगाव शहरात भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली असून, आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बेळगावमध्ये गुरुवारी रात्रीपासून शुक्रवार पहाटेपर्यंत शिवजयंतीनिमित्त भव्य चित्ररथ मिरवणूक होणार आहे. ही मिरवणूक रविवार पेठेतील नरगुंदकर भावे चौक येथून सुरू होणार असून, मारी गल्लीतून, रामदेव गल्लीतून, समाधेवी गल्लीतून, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजीराजे चौक, किर्लोस्कर मार्गावरून पुढे जाईल.
महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली. रस्ते, वीज व्यवस्था, नाल्यांची साफसफाई, झाडांच्या फांद्यांची छाटणी, वीजतारांची उंची, पिण्याच्या पाण्याची सोय, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता आदी मूलभूत सुविधांची त्यांनी तपासणी केली.

महापौर मंगेश पवार यांनी सांगितले की, महापालिकेकडून मिरवणुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवल्या जातील. सार्वजनिक शौचालये संपूर्ण रात्री खुली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
या पाहणी दरम्यान उपमहापौर वाणी जोशी, महापालिकेतील सत्ताधारी पक्षनेते गिरीश धोंगडी, नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments