Belagavi

एसीपीआर संस्थेच्या शताब्दीनिमित्त ‘श्रीकृष्ण नीती’ व्याख्यानाचे आयोजन : एम. बी. जिरली

Share

बेळगावमध्ये एसीपीआर संस्थेच्या शताब्दी निमित्त ‘श्रीकृष्णाची नीती’ या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध संत आणि विचारवंतांचा सहभाग असून कार्यक्रमाला मान्यवर नेत्यांचीही उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती ऍड. एम. बी. जिरली यांनी दिली.

बेळगाव येथील अकॅडमी ऑफ कंपॅरिटिव्ह फिलॉसॉफी अ‍ॅण्ड रिलिजन (एसीपीआर) या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त २४ एप्रिलपासून तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. केएलई येथील जिरगे सभागृहात ‘श्रीकृष्णाची नीती’ या विषयावर हे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती एम.बी. जिरली यांनी दिली.

२४ एप्रिल रोजी अयोध्येच्या गोविंददेव गिरीजी महाराज ‘श्रीकृष्णाची नीती’ यावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचे उद्घाटन केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्राभाकर कोरे यांच्या हस्ते होणार आहे. २५ एप्रिल रोजी रानडे मंदिरात ‘देशाचा आधार : युवा संस्कार’ या विषयावर गोविंददेव गिरीजी महाराज यांचे दुसरे व्याख्यान होईल. तर २६ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या समारोप भाषणाने कार्यक्रमाची सांगता होईल.

एसीपीआरच्या शताब्दी वर्षाची सुरुवात याआधीच २०२४ मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाली होती. या वेळी श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष पद्मभूषण कमलेश पटेल यांचीही उपस्थिती होती. येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी या शताब्दी महोत्सवाची सांगता होणार आहे.

या एक वर्षाच्या कालावधीत देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यापूर्वी एक राष्ट्रीय परिषदही पार पडली आहे. श्री गुरुदेवांच्या ३० हून अधिक ग्रंथांची मालिका प्रसिद्ध होणार आहे. त्यांनी कार्य केलेल्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही एम.बी. जिरली यांनी सांगितले.

Tags: