अनगोळमध्ये मोबाईल शौचालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांची छायाचित्रं असलेले बॅनर्स लावल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दलित युवकांनी याला तीव्र विरोध करत पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने पोलिसांनी मध्यरात्री हस्तक्षेप करत शौचालय सदर बॅनर्स हटविले आहेत.
अनगोळ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे एका धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एस.के.ई. सोसायटीच्या मैदानात पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्मशानभूमी परिसरात तात्पुरते मोबाइल शौचालय उभारण्यात आले होते.
मात्र, या शौचालयाच्या भोवती लावलेल्या बॅनर्सवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्यासह काही नेत्यांचे छायाचित्र असलेले बॅनर वापरण्यात आले. त्यामुळे दलित समाजात संतापाची लाट उसळली. सदर प्रकार हा महापुरुषांचा अपमान असल्याचे म्हणत दलित समाजातील युवकांनी तीव्र निषेध केला.
या प्रकाराची माहिती मिळताच दलित युवकांनी रात्री तिळकवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला.
परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत मध्यरात्रीच मोबाइल शौचालय हटविले असून डीसीपी रोहन जगदीश आणि तिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Recent Comments