मूडलगी तालुक्यातील यादवाड गावात, सिगारेट देण्यास नकार दिल्यामुळे चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या दलित युवकावर ग्रामपंचायत उपाध्यक्षाकडून अमानुष मारहाण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मारहाणीचे दृश्य सिसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूडलगी तालुक्यातील यादवाड गावात, प्रज्वल दोडमनी या दलित युवकावर ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्मेश गाणिगेर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. प्रज्वलने सिगारेट होलसेलमध्ये देण्यास नकार दिला या कारणामुळे त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे कारण पुढे आले आहे. पीयूसी निकाल जाहीर झाल्यानंतर फावल्या वेळेत कामकाज करावे या हेतूने चहा टपरीवर प्रज्वल नुकताच कामावर रुजू झाला होता. दि. 15 एप्रिल रोजी रात्री, ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्मेश गाणिगेर आपल्या साथीदारांसह चहा दुकानात आला. त्याने होलसेल दरात सिगारेट मागितली. मात्र प्रज्वलने नम्रपणे नकार दिला असता, उपाध्यक्षाने त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावलं.
प्रज्वलने शांतपणे त्या बोलण्याला विरोध करताच, कल्मेश गाणिगेर आणि त्याच्या साथीदारांनी त्याला दुकानाबाहेर खेचून नेत अमानुषपणे मारहाण केली. संपूर्ण प्रकार दुकानातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रज्वलला मूडलगी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांत या प्रकरणी कल्मेश गाणिगेरसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायत उपाध्यक्षासारखा लोकप्रतिनिधी असा दम दाखवून काम करणाऱ्या तरुणावर अन्याय करत असेल, तर यादवाड ग्रामपंचायतीची कारभारशैलीच संशयाच्या भोवऱ्यात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.


Recent Comments