बेळगावजवळ आज सकाळी मालवाहतूक करत असलेली रेल्वे रुळावरून घसरल्याने संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी सांबरा रेल्वे स्थानकाजवळ लोकमान्य टिळक एक्सप्रेसला तब्बल पाच तासांपासून थांबावे लागले असून, प्रवाशांनी ट्रॅकशेजारी अन्न तयार करत दिवस काढावा लागला.
बेळगावजवळ आज सकाळी एक मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. ही घटना बेळगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, सध्या रुळांवरील बोगी हटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे सांबरा स्थानकाजवळ लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारी एलटीटी एक्सप्रेस मागील पाच तासांपासून ताटकळत थांबलेली आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
भूक लागल्याने अनेक प्रवाशांनी ट्रॅकशेजारील शेतातच तात्पुरती चुल तयार करून, शेजारी मिळालेल्या लाकडांच्या सहाय्याने अन्न शिजवण्यास सुरुवात केली. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने मदत न मिळाल्याने आणि जेवणाची कोणतीही व्यवस्था न झाल्याने संतप्त प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रुळांवरील बोगी हटवण्याचे काम दुपारपार्यंत युद्धपातळीवर सुरूच असल्याचे दिसून आले.


Recent Comments