Belagavi

ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टचा नवा उपक्रम

Share

बेळगावातील ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टकडून टायनी रॉकेट्स जी.एस.एस. किंडरगार्टन या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सुसज्ज वातावरणात नर्सरी ते ज्युनिअर के.जी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या हेतूने या नवीन इमारतीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.

बेळगावात गेली 50 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेला ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्ट यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रस्टने “टायनी रॉकेट्स जी.एस.एस. किंडरगार्टन” या नवनिर्मित शाळेचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या ‘अलायन्स क्लब इंटरनॅशनल’चे अध्यक्ष सी. बालचंद्रन, समाजसेवक विजय पाटील आणि संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी हेही मान्यवर उपस्थित होते.

सी. बालचंद्रन यांनी आपल्या भाषणात, शिक्षणाचा पहिला टप्पा म्हणजे किंडरगार्टन आणि ज्ञानदीप ट्रस्ट या स्तरावर समाजासाठी चांगले कार्य करत आहे, असे सांगितले. विजय पाटील यांनी शिक्षण हे जीवनभर चालणारे शिक्षण असल्याचे नमूद करत, गुरुचे महत्त्व अधोरेखित केले.

संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी यांनी या नव्या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला. हे त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न असून, या नवीन सुसज्ज इमारतीत नर्सरी व के.जी. विद्यार्थ्यांना आधुनिक आणि अनुकूल वातावरणात शिक्षण मिळणार आहे, असे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. नवीन शेट्टीगार यांनी ज्ञानदीप ट्रस्टच्या गेल्या अनेक वर्षांच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवून हे विद्यालय सुरू करण्यात आले आहे. केवळ ₹१६,५०० वार्षिक शुल्कात हे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास ट्रस्टचे कार्याध्यक्ष धीरजकुमार सिंग, अध्यक्ष चंद्रहास अनवेखर, उपाध्यक्ष इंद्रनील अनवेखर, तसेच सुधाकर देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: