Belagavi

एससी/एसटी शासकीय कर्मचाऱ्यांची बेळगावात बैठक

Share

कर्नाटक राज्य शासकीय एससी/एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या बेळगाव जिल्हा शाखेची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

कर्नाटक राज्य शासकीय एससी/एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीचे राज्याध्यक्ष शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या पदोन्नती, न्याय्य प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय मिळावा यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मे महिन्यात बेळगावात एक भव्य राज्यस्तरीय शासकीय कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष शिवशंकर यांनी सांगितले की,
एससी/एसटी शासकीय कर्मचारी पारदर्शक आणि संविधानिक मार्गाने सेवा देण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांच्यावर अन्याय केला जातो. त्यांना यथोचित पदे दिली जात नाहीत. रिक्त पदांची तत्काळ भरती झाली पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करावी. सरकारने केवळ घोषणा न करता त्या अमलात आणल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही सरकारने जबाबदारी घ्यावी.

या बैठकीत मुख्य सचिव डॉ. विजयकुमार, उपाध्यक्ष मोहन, केंपसिद्धी, जिल्हा शाखेचे मानद अध्यक्ष राहुल मेत्री, अध्यक्ष बसवराज चन्नावर, नागराज कोळकार, राजू कोळकार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: