जागतिक नवकार दिनाचे आयोजन बेळगावातील हिंदवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समारंभाचे व्हर्च्युअल उद्घाटन करत नवकार मंत्राच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला आणि नागरिकांना नऊ संकल्प करण्याचे आवाहन केले.
आर्यिका श्री १०८ अनेकांतसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात, हिंदवाडी येथील महावीर भवनाजवळ जागतिक नवकार दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या व्हर्च्युअल उद्घाटन प्रसंगी नवकार मंत्राचे महत्त्व सांगताना याला जागतिक शांती, अहिंसा आणि आत्मशुद्धीचा आध्यात्मिक मंत्र म्हणत, सर्वांनी नऊ संकल्प करावेत असे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध ९ संकल्प केले असून पाण्याचा काटकसरीने वापर, पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावा, स्वच्छतेचे पालन करा, स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य द्या, देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन द्या, सेंद्रिय शेतीला प्राधान्य, शुद्ध भारतीय अन्नाचा वापर, योग व स्वदेशी खेळांना स्थान, गरिबांना मदत करण्याचा संकल्प आदी संकल्पनेचे आवाहन केले.
कार्यक्रमात साधारणतः ७ हजार लोक एकत्र आले होते, ज्यांनी एकत्र नवकार मंत्राचा जप केला. जिल्ह्यातील सर्व बसदींमध्येही श्रावक-श्राविकांनी एकाचवेळी मंत्रजप केला. जितो बेळगाव शाखेने १,२३,३५२ लोकांची नोंदणी करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
या प्रसंगी जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर सरचिटणीस अभय आदिमनी यांनी आभार मानले. आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ रविराज पाटील, भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव विनोद दोड्डन्नार, श्रीपाल खेमलापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments