Belagavi

शुभम शेळके हद्दपारी प्रकरणाची पुढील सुनावणी २१ एप्रिलला

Share

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हद्दपारीच्या प्रस्तावावर आज न्यायदंडाधिकारी यांच्या समोर सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे.एम. कालिमिर्ची यांनी २२ मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याविरोधात हद्दपारी व जिल्हाबंदी प्रस्ताव पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर, संबंधित नोटीस २८ मार्च रोजी शेळके यांना देण्यात आली होती. आज ७ एप्रिल रोजी, या प्रकरणावर न्यायदंडाधिकारी म्हणून उपायुक्त रोहन जगदीश यांच्या समोर सुनावणी पार पडली. शुभम शेळके यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे यांनी बाजू मांडत हद्दपारीच्या प्रस्तावावर जोरदार आक्षेप नोंदविला.

शुभम शेळके यांच्याविरोधात असलेल्या ७ गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे. उर्वरित गुन्हे न्यायप्रविष्ट असून त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या परिस्थितीत हद्दपारीची कोणतीही कारवाई ही संविधान आणि कायद्याचे उल्लंघन करणारी आहे, असे मत बिर्जे यांनी नोंदवले. त्यांनी माळमारुती पोलिसांनी सादर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचेही ऍड. महेश बिर्जे यांनी आक्षेपात नमूद केले.

या सुनावणीस ऍड. बाळासाहेब कागणकर, ऍड. रिचमॅन रिकी, ऍड. वैभव कुट्रे, ऍड. अश्वजित चौधरी, तसेच धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रवीण रेडेकर, विजय जाधव, अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, सुरज जाधव, मोतेश बार्देशकर, अभिषेक कारेकर आदी उपस्थित होते.

Tags: