Belagavi

तरुणांनो, शस्त्रे घेऊन रिल्स स्टंटबाजी करताय..? तर सावध व्हा किंवा तुरुंगाची तयारी ठेवा! : पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा

Share

तरुणांनो सावध राहा! सोशल मीडियावर मशेरी, तलवारी किंवा बंदूक घेऊन रील्स बनवल्या, तर आता थेट तुरुंगाची हवा खावी लागेल. पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी याबाबत कठोर भूमिका घेत शस्त्र हातात घेतलं, की तुरुंगात जाण्यास तयार रहा असा स्पष्ट इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर गुंडगिरी स्टाईलने शस्त्र हातात घेतलेले व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. काही तरुण आपल्या हातात तलवार, मशेरी किंवा खेळण्यातली पिस्तूल घेऊन दादा, भाई, डॉनसारखी अॅक्शन करत रील्स बनवत आहेत. पण आता असे स्टंट करणे रील स्टार्सना महागात पडणार आहे.

बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी याबाबत स्पष्ट ताकीद दिली असून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडियावर शस्त्राचे प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बेंगळुरूमध्ये असेच प्रकार करणाऱ्या दोन तरुणांना अटक झाली आहे, आणि आता बेळगाव पोलिसही अशा रील्स करणाऱ्यांना शोधून थेट तुरुंगात टाकणार असल्याचा इशारा दिला आहे.

पोलिसांनी यासाठी विशेष पथक तयार केले असून, सोशल मीडियावरील अशा व्हिडीओंवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. जर कोणी शस्त्र घेऊन स्टाईल मारताना दिसला, तर त्याला पोलिस ठाण्यात जाऊन तपासाला सामोरे जावे लागेल. शिवाय, संबंधितांवर कठोर कलमांतर्गत गुन्हे दाखल करून थेट तुरुंगात धाडले जाईल, असेही पोलिस अधीक्षकांनी ठणकावले आहे.

Tags: