परिवहन मंडळाच्या मेकॅनिकने महिलादिनी जीवन संपवल्याची घटना ताजी असताना परिवहन मंडळाच्या चालकाने बसमध्येच गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज बेळगाव मधील बस आगारात घडली.
रजा मंजूर न झाल्याने परिवहन चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालचंद्र शिवप्पा तुकोजी (वय 47, रा. मारुती गल्ली, जुनी गांधी नगर) असे मृत चालकाचे नाव आहे.
मोठ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी आगार व्यवस्थापकाकडे सुट्टीसाठी अर्ज करणाऱ्या परिवहन बस चालकाने रजा न दिल्याने सीबीटी शहापूर नाका ते वडगाव या बसमध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या त्यांच्या बहिणीच्या मुलीचा विवाह होणार होता. मात्र, डेपो व्यवस्थापनाने कामावर हजर राहण्यास सांगितल्याने त्यांनी तणावाखाली येऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला. मृत बालचंद्र शिवप्पा तुकोजी यांना १३ वर्षांचा मुलगा आहे. डेपो व्यवस्थापनाने त्यांना ६ एप्रिलपर्यंत रजा मंजूर असल्याचे सांगितले होते. मात्र, आज सकाळीच ड्युटीवर हजर राहण्याचा आदेश दिला. यामुळे तणावाखाली जाऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती मृत तुकोजी यांच्या नातेवाईकांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी डीसीपी रोहन जगदीश यांनी माहिती देताना सांगितले की, कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पुढील तपास करण्यात येईल.
अलीकडेच कामाच्या दबावामुळे परिवहन विभागाच्या मेकॅनिक कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. आता चालकानेही रजा मंजूर न झाल्याने आत्महत्या केल्याने परिवहन व्यवस्थापनावर गंभीर आरोप होत आहेत.


Recent Comments