Belagavi

बेळगावमध्ये २०० हुन अधिक राऊडी शिटर्सची परेड

Share

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या 10 वर्षांत कोणत्याही गुन्ह्यात सामील नसलेल्या 10 जणांची नावे राऊडी शिटर यादीतून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी आयोजित राऊडी शिटर परेडनंतर पोलिस आयुक्त ययाडा मार्टिन मार्बनयांग यांनी ही माहिती दिली.

शनिवारी बेळगाव जिल्हा पोलीस मैदानावर एपीएमसी, माळमारुती, मार्केट, शहापूर, कॅम्प, उद्यमबाग, खडेबाजार, वडगाव, हिरेबागेवाडी, मारीहाळ आणि काकती या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील राऊडी शिटर्सची परेड घेण्यात आली. या वेळी 200 हून अधिक राऊडी शिटर्सना समुपदेशन करण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बनयांग म्हणाले, गेल्या 10 वर्षांत कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसलेल्या 10 जणांची नावे राऊडी शिटर यादीतून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित रावडी शिटर्सची पुनरावलोकन प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने योग्य ती कारवाई केली जाईल.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचे नावही राऊडी यादीत आल्याने त्यांच्या अनुपस्थितीतबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले, आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. ते जर दोषी असतील, तर कायदेशीर कारवाई होईल. पुढील परेडमध्ये त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बेळगावमध्ये नुकतेच नेहरू नगर पीजीमध्ये आत्महत्या केलेल्या ऐश्वर्या लक्ष्मी प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. वॉट्सअ‍ॅप मेसेजच्या आधारे तिचा प्रियकर आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमिनीच्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags: