बेळगावात महिला दिन कार्यक्रमासाठी शिक्षिकांनी शाळेला टाळे लावल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना विनाकारण सुट्टी दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शहापूर येथील कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक ८ मध्ये हा प्रकार गुरुवारी घडला. महिला दिन आणि महिला सशक्तीकरण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षिकांनी संपूर्ण शाळेला टाळे लावले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी मिळाली.
जिल्हा शिक्षण उपसंचालक (डीडीपीआय) लीलावती हिरेमठ यांनी फक्त दोन शिक्षिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असा आदेश दिला होता. मात्र, आदेशाकडे दुर्लक्ष करत संपूर्ण शाळा बंद करून सर्व शिक्षिका कार्यक्रमाला गेल्या. कुमार गंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या व्यवस्थेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कार्यक्रमात सहभागी व्हावे असा आदेश देण्यात आला होता. मात्र, डीडीपीआयच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शाळेला टाळे लावल्याने पालक आक्रमक झाले आहेत.
या प्रकाराची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेतली असून, जबाबदार शिक्षिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Recent Comments