बेळगाव महापालिकेत गुरुवारी झालेल्या जलव्यवस्थापन बैठकीत एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती तसेच उपस्थित अधिकाऱ्यांकडे पुरेशी माहिती नसल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. आयुक्तांनी या प्रकरणी कडक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना पुढील बैठकीसाठी पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

बेळगाव महापालिकेत गुरुवारी जलव्यवस्थापनावर महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा हाताळणाऱ्या एल अँड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे उपस्थित असलेल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे आवश्यक माहिती नव्हती, परिणामी बैठकीतून कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.
यामुळे बैठकीला उपस्थित असलेले नगरसेवक हनुमंत कोंगाळी, रवी धोत्रे, शाहिद पठाण आणि इतर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या कंपनीला लोकांच्या समस्या सोडवण्याची कसलीही तजवीज नाही. कामे अर्धवट सोडली जात आहेत. या सगळ्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, असे नगरसेवकांनी ठणकावून सांगितले.

या गोंधळानंतर महापालिका आयुक्त बी. शुभा यांनी ३ एप्रिल रोजी पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेतला. एल अँड टी , हेस्कॉम आणि इतर संबंधित विभागांचे सर्व वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि जबाबदार व्यक्ती उपस्थित राहायलाच हवेत. तसेच, संपूर्ण अहवाल आणि कागदपत्रांसह येण्याचे स्पष्ट शब्दांत आदेशही त्यांनी दिले.
या बैठकीत उपमहापौर वाणी जोशी, महापालिका सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments