११ दिवसांपूर्वी गोंडस बाळाला जन्म दिलेल्या महिलेच्या माहेरच्या मंडळींवर कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बेळगाव तालुक्यातील मच्छे गावातील लक्ष्मी गल्ली येथील प्रतिक्षा (वय 22) हिचा एक वर्षापूर्वी होनगा गावातील भैरू मेत्री (वय 25) याच्यासोबत विवाह झाला होता. 11 दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलास जन्म दिला. प्रसूतीनंतर ती सध्या माहेरी राहत असून, तिला आणि बाळाला सासरी परत पाठवावे, यासाठी भैरूच्या कुटुंबीयांनी आग्रह धरला.
बुधवारी दुपारी भैरू आपल्या नातेवाईकांसह प्रतिक्षाच्या माहेरी गेला. यावेळी झालेल्या वादात प्रतिक्षाच्या आईसह 13 जणांना मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर प्रतिक्षाच्या आईला रस्त्यावर खेचून तिच्या कपड्यांची विटंबना करण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रतिक्षाच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दलित समाजातीलच काही लोकांकडून दलित कुटुंबावर हल्ला झाल्याची माहिती प्रतीक्षाच नातेवाईक मिलिंद बडिगेर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ते पुढे म्हणाले, याप्रकरणी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले असता, विद्युतपुरवठा नसल्याचे कारण सांगून एफआयआर दाखल करून घेण्यात आली नाही.याप्रकरणी पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
सदर घटनेतील हल्ला झालेल्या महिलेने घडल्या प्रकाराबाबत माहिती देताना सांगितले, मुलीला सासरी पाठविण्यावरून सुरु झालेल्या वादात आपल्यावर हल्ला करण्यात आला. घरात घुसून रस्त्यावर खेचत आणून आपल्यावर हल्ला करण्यात आला. लग्नाच्या काही दिवसांतच, आपल्या मुलीला हुंड्यासाठी त्रास देण्यात आला. दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यस्थी करून वडिलधाऱ्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही आपल्या मुलीचा छळ सुरूच होता. आपल्यावर झालेल्या अत्याचाराला न्याय मिळावा अशी अपेक्षा सदर महिलेने व्यक्त केली.
या घटनेची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली असून, घटनेत जखमी झालेल्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


Recent Comments