Belagavi

बेळगावात पीजीमध्ये राहणाऱ्या युवतीची आत्महत्या

Share

बेळगाव शहरातील नेहरू नगरमध्ये असलेल्या एका वसतिगृहात राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐश्वर्यलक्ष्मी गलगळी रा. विजयपूर असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर युवतीचा मित्र फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बेळगाव शहरातील नेहरू नगर परिसरात असलेल्या एका वसतिगृहात राहणाऱ्या ऐश्वर्यलक्ष्मी गलगळी (वय 24, रा. विजयपूर) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती बेळगावमधील एका खासगी कंपनीत इंटर्नशिप करत होती. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6.30 ते 7.30 च्या दरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे. ऐश्वर्यलक्ष्मी हिने विजयपूरमध्ये एमबीएची पदवी घेतली होती आणि बेळगावमधील एक्कस कंपनी मध्ये प्रशिक्षण घेत होती. दरम्यान, तिच्या मित्राने तिला अनेकदा फोन केला होता. मात्र, फोन न उचलल्यामुळे तो थेट वसतिगृहात गेला. तिथे त्याला ऐश्वर्यलक्ष्मीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहताच तो घाबरून तेथून फरार झाला.

या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, मृत युवतीच्या कॉल डिटेल्स आणि वसतिगृहाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मित्राचा शोध घेण्यासाठी तपासाचे जाळे टाकण्यात आले आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलिस तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Tags: