Belagavi

पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक : युवकाला अटक

Share

मद्यप्राशन केलेल्या युवकाने बुधवारी रात्री पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक केली. स्थानिक नागरिकांनी त्या युवकाला पकडून मार्केट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेमुळे काही काळ या भागातील वातावरण गढूळ झाले होते.

यासिर युसुफ नेसरगी वय 19 असे अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक करणाऱ्या युवकाचे नाव असून तो उज्वल नगर बेळगावचा रहिवाशी आहे. बुधवारी रात्री त्याने पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक केली. यावेळी स्थानिकांनी त्याला रंगेहाथ पकडून जमावाने खांबाला बांधून ठेवले होते. घटनेमुळे परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिकांनी त्या युवकाला रंगेहाथ पकडून खांबाला बांधून ठेवले होते. यावेळी दगडफेकीचे कारण विचारले असता सुरवातीला, माझी चूक झाली, मला माफ करा असे सांगणाऱ्या युवकाने रंगपंचमीदिनी बुरखा परिधान केल्याने हे कृत्य केल्याचे सांगितले.

पांगुळ गल्ली येथे होळी सण उत्साहात आणि शांततेत साजरा केला जातो. येथील जागृत देवस्थान असणाऱ्या अश्वत्थामा मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते असे सांगत येथील शांतता आणि सौहार्दतेचे वातावरण कोणीही बिघडवू नये असे स्थानिक रहिवासी मिलिंद बसरीकट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दारूच्या नशेत दगड फेकणाऱ्या युवकाने आपली चूक कबूल केली आहे. पांगुळ गल्ली ही बाजारपेठ असल्याने, सर्व जाती धर्माचे लोक येथे येतात. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजेत, असे स्थानिक रहिवासी आनंदाचे म्हणाले.

घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. लागलीच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केले आणि सदर युवकाला ताब्यात घेतले. काही समाजकंठकांमुळे सामाजिक वातावरण गढूळ होते. एका दुसऱ्याच्या अशा कुत्सित बुद्धीमुळे संपूर्ण समाजाला त्रास सहन करावा लागतो. याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी अशा उचापती करणाऱ्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे. जेणेकरून सामाजिक वातावरण शांत राहील आणि समाजात सौहार्दता टिकून राहील, असे सुज्ञ नागरिकातून बोलले जात आहे.

Tags: