Belagavi

हजारो कुस्ती शौकिनांच्या साक्षीने विशाल हरियाणाने गाजवला आनंदवाडीचा कुस्ती आखाडा ….

Share

आनंदवाडीच्या कुस्ती आखाड्यात बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात हजारो कुस्ती शौकिनांच्या साक्षीने हरियाणाच्या विशालने प्रतिस्पर्धी पैलवानाला आस्मान दाखवत उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

अवघ्या 45 सेकंदात छडीटांग डावावर प्रतिस्पर्धी पैलवान महाराष्ट्राचा रुस्तुमे हिंद सिकंदर शेख याला आस्मान दाखवत हरियाणा केसरी। विशाल हरियाणाने कुस्ती शौकिनांच्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळविल्या.
बेळगाव केसरी किताबासाठी सोहेल इराण आणि महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात झालेली कुस्ती चांगलीच रंगली. दोन्ही पैलवान एकमेकांना बराच वेळ आजमावत होते.

12 व्या मिनिटाला प्रकाश बनकर हा सोहेल याला आसमान दाखवीतो असे वाटत असतानाच सोहेलने बनकरचा डाव उधळून लावला. अखेर वेळेअभावी ही कुस्ती गुणावर निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्रकाश बनकर याने एकेरी पट काढून सोहेलवर गुण मिळवत बेळगाव केसरी किताब पटकावला.

हादी इराण आणि दादा शेळके यांच्यात बेळगाव शौर्य किताबासाठी झालेल्या कुस्तीच आठव्या मिनिटाला दादा शेळके याने दुहेरी पट काढून हादी इराणला खाली घेत उलटी डावावर आस्मान दाखवत बेळगाव शौर्य हा किताब मिळविला. महाराष्ट्राचा शिवा उर्फ रवी चव्हाण व लॅटिन अमेरिकेचा फ्रॅंडीला यांच्यात झालेल्या बेळगाव रणवीर किताबासाठीच्या कुस्तीत पायाला कडी लावत एकेरी हाताचा कच चढवून शिवाने लॅटिन अमेरिकेच्या फ्रॅंडीला याला आसमान दाखविले. तर महिलांच्या कुस्तीत बेळगावच्या स्वाती पाटील हिने हरियाणाच्या हिमानी हिला हिस्सा डावावर चित केले.

एम. आर. चौगुले, रमाकांत कोंडुस्कर, सुधीर गड्डे, तुषार गड्डे, संजय सुंठकर, बाळकृष्ण तोप्पीनकट्टी, मृणाल हेब्बाळकर, नागेश छाब्रिया, संतोष पर्वतराव, सतीश चौगुले, गणपत पाटील, श्रीकांत कदम, शिवाजीराव अतिवाडकर, अविनाश पोतदार, सोमनाथ जाधव, अमर अकानोजी, डॉ. सोनवलकर, जय भारत फाउंडेशन, रवी जाधव यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला, कुस्ती शौकिनांच्या विनंतीवरून कुस्तीचा जादूगार आणि यु ट्यूबचा बादशहा नेपाळच्या देव थापाच्या कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या मनोरंजनात्मक कुस्तीत देव थापा याने गुंडा हरिद्वारचा घुटण्यावरती चित करीत विजय मिळविला. या कुस्तीने लोकांचे बरेच मनोरंजन केले.

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हरियाणा केसरी विशाल यांच्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती झाली. ही कुस्ती खूपच रोमांचक झाली. टाळ्या आणि शिट्ट्यांनी मैदान गुंजले होते. दोघांनी एक दुसऱ्याला आजमावले. अखेर हरियाणाचा कुस्तीपटू विशाल याने सिकंदर शेखला हरवून मल्ल सम्राट पुरस्कार जिंकला.

नागेश छाब्रिया यांनी लावलेली दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोहेल इराण आणि प्रकाश बनकर यांच्यात झाली. यात प्रकाश बनकर याने सोहेल इराणला पराभूत करून बेळगावच्या मातीचा रंग दाखविला. बेळगाव रणवीर, बेळगाव शौर्य किताबासह इतर कुस्त्याही चुरशीच्या झाल्या. डॉ. सोनाली सरनोबत यांनी पुरस्कृत केलेल्या महिलांच्या कुस्तीलाही चांगल्याच टाळ्या मिळाल्या. हरियाणाची हिमानी आणि बेळगावची स्वाती पाटील यांच्यातील कुस्तीत बेळगावच्या स्वाती पाटील हिने विजयी पताका फडकविली.

सुरुवातीला बेळगावकरांना कुस्तीचे प्रचंड वेड होते. मध्यंतरी ही क्रेझ कमी झाली होती. आता पुन्हा या खेळाला पुनर्जीवन प्राप्त होत आहे. आनंदवाडी आखाड्यात झालेल्या कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी भाग घेतला आणि उत्तम कामगिरी केली. यावेळी एकूण 90 कुस्त्या झाल्या. कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा, इराण, अमेरिका आणि इतर भागांतील कुस्तीपटूंनी यात भाग घेतला होता. सुमारे 200 कुस्ती सामने होणार होते. तथापि, वेळेअभावी सर्व कुस्त्या झाल्या नाहीत. पुढच्या वेळी दोन दिवसांची कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाईल, असे बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले.

यावेळी वर्धमान गंगाई, युवराज हुलजी, एस. एस. शिमोगा, भूषण काकतकर, बाळू पाटील, हणमंतराव बिर्जे, चंद्रकांत बुद्दनवर, बाळाराम पाटील जोतिबा हुंदरे, महावीर पाटील, कल्लाप्पा नाकाडी आणि इतरांनी कुस्ती सामना यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात हजारो कुस्तीप्रेमी सहभागी झाले होते.

Tags: