Dharwad

धारवाड मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

Share

धारवाड तालुक्यातील मुम्मीगट्टी गावातील ४६ जणांना संशयास्पद तापाचे निदान झाले असून त्यापैकी ४ जणांना डेंग्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच एका तीन वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला असून, त्या बालकालाही डेंग्यूचा ताप झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने हा अहवाल सादर केला असून या संदर्भात, जिल्हा हिवताप अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा कीटकशास्त्रज्ञ आणि कर्मचारी यांनी मुम्मीगट्टी गावाला भेट देऊन गावातील डेंग्यू निर्मूलन कामाचे सर्वेक्षण व देखरेख केली. (फ्लो)

तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तालुका कार्यकारी अधिकारी, पंचायत विकास अधिकारी यांची बैठक घेऊन नियंत्रण उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार केला. कोरडा दिवस तातडीने पाळणे, घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने घरोघरी भेट दिली, यावेळी ठिकठिकाणी आढळून आलेला घनकचरा ग्रामपंचायत कचरा वाहनातून तत्काळ उचलण्यात आला.

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासंदर्भात नागरिकांना आवश्यक त्या सूचना करण्यात आला. ताप आलेल्या रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यासाठी मुम्मीगट्टी गावात तात्पुरते स्थानिक “फिव्हर क्लिनिक” सुरू करण्यात आले आहे.

Tags: