Dharwad

डीकेशी-सिद्धरामय्या यांच्या खुर्चीच्या भांडणात सरकार कोसळेल : प्रल्हाद जोशी

Share

सिद्धरामय्या यांना खुर्चीवरून हटवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार करत आहेत, तर सिद्धरामय्या आपली खुर्ची टिकवण्यासाठी डीकेशीना तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर हे सरकार टिकेल की नाही शंकाच आहे, असे भाकीत धारवाड लोकसभा भाजपचे उमेदवार प्रल्हाद जोशी यांनी केले.

धारवाड तालुक्यातील तडकोड गावात एका खुल्या प्रचार सभेत बोलताना जोशी म्हणाले की, काँग्रेसच्या दोन नेत्यांत खुर्चीसाठी भांडणे सुरु आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. या भांडणात निवडणुकीनंतर सरकार पडू शकते. डीकेशी सिद्धरामय्या यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सिद्धरामय्या आपली खुर्ची मजबूत करण्यासाठी डीकेशीना आत पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून ते आम्हाला आणि जनतेला त्रास देत आहेत. मी आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास होऊ देणार नाही. हीच परिस्थिती कायम राहिल्यास आपण स्वतः रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

काँग्रेस पक्षाने 65 वर्षे देशावर राज्य केले आहे. इंग्रजांनी 200 वर्षे राज्य केले. यूपीएच्या काळात किती घोटाळे झाले हे आपल्याला माहीत आहे. काँग्रेसने टूजी घोटाळा, कोळसा घोटाळा असे अनेक घोटाळे केले. आम्ही आता 5G दिले आहे, आमच्या कार्यकाळात भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात कसलाही भ्रष्टाचार झाला नाही. यूपीएच्या काळात कॉमनवेल्थ गेम्समध्ये घोटाळा केला. काँग्रेस पक्ष निर्लज्ज आहे. काँग्रेसने 10 वर्षात 12 लाख कोटी कमावले आहेत. मोदींच्या कारभारात भ्रष्टाचार आहे का ते पहा.

एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असे सांगत त्यांनी सिद्धरामय्या यांची नक्कल करून 10 किलो तांदूळ न 5 किलो तांदूळ दिला. मंत्री लाड साहेबांनी विचारले की मोदींनी काय काम केले आहे..? सौंदत्ती येथील मलप्रभा नदीचे पिण्याचे पाणी पाईप लाईनद्वारे घरोघरी पुरविले जात आहे. लाडसाहेब, हीच पाईपलाईन ओलांडून तुमची कार जाते ना? असा सवाल करत प्रल्हाद जोशी यांनी प्रचारसभेत काँग्रेसच्या प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांवर सडकून टीका केली.

Tags: