बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलीस विभागाने आधुनिक पाऊल उचलले आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी आमदार लक्ष्मण सवदी यांनी आपल्या आमदार निधीतून मोठा निधी मंजूर केला आहे.

अथणी शहरातील डॉ. आंबेडकर सर्कल, स्वामी विवेकानंद सर्कल, शिवयोगी सर्कल आणि बसवेश्वर सर्कल या प्रमुख चौकांमधील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार लक्ष्मण सवदी यांनी पुढाकार घेतला आहे. पोलीस विभागाच्या अहवालानुसार, एआय आधारित सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आमदार निधीतून सुमारे २२ लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना कडक इशारा देत आमदार सवदी म्हणाले की, या नवीन तंत्रज्ञानामुळे हेल्मेट न घालणाऱ्या वाहनधारकांना स्वयंचलित यंत्रणेद्वारे शोधून थेट दंडाची पावती पाठवली जाईल. दंड टाळण्यासाठी आणि स्वतःच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने सक्तीने हेल्मेट वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. चौकात पोलीस असोत वा नसोत, हे कॅमेरे नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवणार असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती लक्ष्मण सवदी यांनी केली.


Recent Comments