Dharwad

धारवाडमध्ये खुनांचे सत्र; नवलूर भागात एका महिलेची निर्घृण हत्या

Share

धारवाडमध्ये सुरू असलेल्या खुनांच्या घटनांमुळे लोक हैराण झाले आहेत. दोन खुनाच्या घटनांची उकल होण्यापूर्वीच आज आणखी एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांना धक्का बसला आहे.

नवलूर गावातील रहिवासी कारेव्वा इरबगेर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हुबळी-धारवाड मुख्य रस्त्यालगत असलेल्या विठ्ठल मंदिराजवळ पहाटे या महिलेची हत्या करण्यात आली. स्थानिकांच्या माहितीवरून विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

गेल्या चार दिवसांत धारवाड येथील विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. आंबेडकर कॉलनी, शेट्टर कॉलनी येथे एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली. रविवारी रात्री उशिरा विनया डेअरी रोड येथे क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला, यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला.

या दोन घटनांचा तपास लागण्याआधीच आणखी एका महिलेची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. सध्या महिलेचा मृतदेह धारवाड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला असून विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरु केला आहे.

Tags: